निश्यबद्ध
#निशब्द
दुपारचे १:४५ वाजताची वेळ.. दुकान बंद करणार इतक्यात एक आजीबाई दुकानाच्या काचेतून डोकावत म्हणाली "तांदूळ हायेत का"?
मी म्हटलं "आहेत.."
"किती रूपे? तिने विचारलं..
तिच्याकडे पहात क्षणभर गोंधळून जात मूळ किंमतीपेक्षा कमी किंमत सांगत मी ३५ रूपये किलो म्हणालो..
"दोन किलो दे.." असं म्हणत कमरेत खोचलेले पैसे काढू लागली.. पण ६० रूपयेच निघाले..
"दा रूपे कमी हायेत.. देते हा बाबू..." असे म्हणत दुकानाच्या दारातच बसली.. हातातल्या प्लॅस्टिकच्या पिशवीमधून १०० च्या दोन नोटा आणि १० च्या एक दोन नोटांची सुरळी बाहेर काढत मला देणार... ईतक्यात..
माझ्या डोक्यातला गोंधळ हा चालूच होता.. मी तिच्याकडे पाहतच होतो..
कळकट चेहरा.. चेह-यावरच्या सुरकुत्या.. हा आयुष्यातला प्रचंड संघर्ष तिच्या चेह-यावर स्पष्टपणे दिसत होता..
मी थोडा नर्व्हसच झालो होतो.. दुकानातला माझा सहकारी प्रताप.. त्याला म्हणालो ..यार मी पैसे नाही घेत हिच्याकडून.. त्याने लागलीच होकार कळवला.. मी सुखावलो आणि म्हणालो.. "मावशी पैसे राहू दे.."
"का रे बाबू...? पैसे घे....." ती म्हणाली.
"नको राहू दे मावशी, ठेव तूला...." आम्ही दोघे.
पुढे प्लॅस्टिकच्या पिशवीमधील काही वस्तू काढत ती बोलू लागली..
"सकालीच आलती.. तिकडं बॅंकेच्या इकडं बोलवलेलं.. सगल्यांना बशिवलं... हे सामान दिलं.. चाय दिला.." हे सगळं ती खूप समाधानाने आम्हाला सांगत होती..
मग मी विचारपूस केली.. कुठून आलीस? आता कशी जाणार? वगैरे..
"चालंतंच जाणार.. कोन सोडनार आपल्याला? त्यादिवस पन एवढा सामान दिला पोलिसान.. ही गोन भरून.. आता वजन नेणार कोन? मंग पोलिसानच सोडलं नवघर पाटीलपा-या परंत.. गारीतून.."
"घरी कोणी आहे..? की....."
माझं वाक्य तोडत.. "येकलीच.....घर हाय.. बांधून दिलंय.. तिन खोल्या हान.. अजून पर्रत काईच व्यसन न्हाय.. विडी, तंबाख, दारू.. काय नाय.. फक्त चाय.." हातवारे करत ही गोष्ट तिने खूप अभिमानाने सांगितली..
पो-या गेला...येकच पो-या.. पन रेल्वेन गेला.. (एॅक्सिडेंटमध्ये गेला)
आम्ही निशब्द....
पिशवीत हात घालत एक सरकारी ओळखपत्र काढत पोराचा फोटो दाखवला..
"रेल्वेन गेला.. आता येकलीच राहते.." असं करत करत एक एक वस्तू दाखवायला तिने सुरूवात केली..
"ह्यो.. पो-या.." ओळखपत्रावरचा फोटो दाखवत म्हणाली.. "ह्यो ठाकूर.. हितेंद्र ठाकूर.."
जमिन वगैरे आहे कि, विकली..? मी विचारलं.
"नाय.. नाय जागा नाय.." .... ह्यो पास.. बसचा पास.. एका कागदावरचा फोटो दाखवत म्हणाली... "ह्यो मोदी.."
कौतुकाने आम्ही तिच्याकडे पाहतच राहीलो.. हे मोदी असं..?
"हा.. ह्यो मोदी.."
"काय मिळतं काय सरकारकडून?"... माझा पुढचा प्रश्न.
"नाय.. अजून परत नाय.. पन मिलंल.. मिलंल.." असं म्हणत आपला आशावाद तिने जागवला...
माझा सहकारी प्रताप तिच्याशी पुढे बोलू लागला.. तिचा पो-या.. तिची पोरगी.. मग पोरीचा नवरा... ती एक एक ओळख सांगत होती आणि प्रताप बरोब्बर ती नावं सांगत होता.. अशीच एक ओळख त्याने सांगितल्यावर तिने प्रताप ला गंमतीत जी टाळी दिली ना ती मी कधीच विसरू शकणार नाही. काय ते हास्य.. आईशप्पथ सांगतो मी शब्दात नाही मांडू शकत..
किती निखळ आणि किती निरागस....आयुष्यात कुठल्याच गोष्टीची तक्रार नाही... साला चेह-यावरती पण जाणवलं नाही... कुठे बोलण्यात तक्रारीचा सूर नाही की दु:खाचा लवलेश नाही.. ना भविष्याचा कुठलाही प्रश्न.. ना लॉकडाऊनची तक्रार ना कोरोनाची चिंता.. तरणा पोर गेला पण दु:ख कवटाळत बसली नाही.. जे जे नियतीने दिलं ते खुल्या दिलाने स्विकारलं.
हे सगळं पचवण्याची, सहन करण्याची ताकद येते कुठून?
ती संघर्षातूनच येत असावी..
खरंच आपण खूप खुजे आहोत.. किती तक्रारी करतो..? सातत्याने करतो..
किती प्रश्न आपण स्वत:भोवतीच तयार करतो.. आता आपलं कसं होणार.? भविष्याचं कसं होणार? आयुष्याचं काय होणार?
अशा प्रश्नांचं.. तक्रारींचं ओझं घेऊन आपण सतत जगत आलोय.... हे पुन्हा एकदा आजच्या एका छोट्याश्या घटनेने दाखवून दिलंय.
आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहीलं तर आयुष्य खूप सुंदर आहे.
विशाल चंपानेरकर
#सफाळे
Comments
Post a Comment